राजमुद्रा वृत्तसेवा | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर आता गोव्यातही मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि इतर पक्षांना घाम फुटला आहे. गोव्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत आपचं सरकार आल्यास ३०० यूनिट वीज मोफत देण्याची घोषणी त्यांनी केली आहे. गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षानं चार आश्वासनं दिली आहेत. ही चारही आश्वासनं विजेशी निगडीत आहेत. यावेळी केजरीवाल यांनी काँग्रस आणि भाजपावर निशाणा साधला. जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी केजरीवाल यांनी गोव्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
“गोवा सुदंर आहे. मात्र इथलं राजकारण खराब आहे. भाजपा आणि काँग्रेसनं मिळून जनतेची फसवणूक केली आहे. आमचं सरकार गोव्यात आलं तर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३०० यूनिट वीज मोफत दिली जाईल. विजेची जुनी बिलं माफ केली जातील. त्याचबरोबर २४ तास वीज उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळतो”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीत केजरीवाल सरकार प्रत्येक कुटुंबाला २०० यूनिट वीज मोफत देत आहे. मात्र गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ३०० यूनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे.