जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला कार्यकर्त्यांनी एकजुटीने लागावे. राष्ट्रवादी त्यांना ताकद देईल. पक्षात राहून प्रामाणिकपणे कार्यरत राहा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी केले. जळगाव राष्ट्रवादी कार्यालयाच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, समन्वयक विलास पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, प्रवक्ता योगेश देसले उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाच्या आढावा बैठकीत प्रथमच आलेले आदिक यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा दौरा होण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे राजकीय चित्र बदलले पाहिजे तरच त्यांना समाधान वाटेल, असे सांगून आदिक म्हणाले भविष्यात आमदारांची संख्या वाढावी म्हणून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला देशाने मान्य केला आहे. केंद्रीय नेतृत्व शरद पवारांसारखे असावे हे राजकीय नेत्यांना मान्य झाले आहे. त्यामुळे भविष्यात चित्र बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
ईडीच्या माध्यमातून भाजपा केंद्र सरकारने गेल्या साडेसात वर्षात पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली नाही, मात्र आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे लागून नाहक त्यांना त्रास दिला जात आहे. परंतु ते ईडीला सामोरे जातील यात शंका नाही असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील यांनी कार्याचा आढावा घेतला. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचे समयोचित भाषण झाले.
गटबाजीवर रंगली चर्चा
पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गटबाजी असल्याचे सांगून त्यांचे लक्ष वेधले. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच आलेले पक्ष निरीक्षक आदिक हे मात्र या प्रकाराने काही वेळ स्तब्ध झाले होते. पक्षात गटबाजी असून निष्ठावंत व चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. शहरातील फलकावर अनेक नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे नाव डावलले जाते असे सांगून कार्यकर्त्यांनी ही गटबाजी संपली पाहिजे अशी अपेक्षा केली. त्यावर पक्ष निरीक्षक आदिक यांनी सांगितले की पक्षात कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही. या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी उघडपणे गटबाजीचे शक्तिप्रदर्शन केले. त्यात इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जात नाही. पक्षात समन्वय नसल्यामुळे योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या वेळी पक्ष निरीक्षक अविनाश आदिक, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, कार्याअध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, महानगरअध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कल्पना पाटील, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, अल्पसंख्यांक अध्यक्ष रिजवान खाटीक, उमेश नेमाडे, अशोक लाडवंजारी, संजय पवार, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष गौरव लवंगले, जयश्री पाटील, प्रमुख सल्लागार रमेश भोले, हुसेन बाबा, फिरोज भाई, जितेंद्र चांगरे, कुणाल पवार, अक्षय वंजारी, ममता तडवी, अर्चना कदम, उज्वला शिंदे, कमल पाटील आदी उपस्थित होते.