नवीन पदांसाठी अनेकजण इच्छुक
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात सध्या काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीत देखील फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नव्या तर काही जुन्या पदाधिकाऱ्यांना नव्याने निर्माण केलेली पदे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून मनोज दयाराम चौधरी यांना आपल्याकडे खेचण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. जळगाव शहराची धुरा त्यांच्यावर सोपविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्वबळाचा नारा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दुखावले आहे. त्यात जळगाव मध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाला सुरुंग लावण्याचे काम पक्ष संघटना करीत असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने निष्ठावंत मनोज दयाराम चौधरी यांच्याशी काँग्रेसचे आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी संपर्क केला असल्याचे वृत्त आहे. त्यांची घरवापसी करून घेण्यात त्यांना यश आले आहे. मनोज चौधरी येत्या तीन-चार महिन्यांनंतर काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. नेतृत्वाच्या विकेंद्रीकरणाचे सूत्र पक्षाने स्वीकारले असून त्यानुसार जिल्ह्यात प्रमुख पदाधिकार्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.
शिवसेनेने केल्या प्रमाणे दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस दोन-दोन कार्याध्यक्ष नेमणार आहे. याशिवाय जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष ही पदेही असणार आहेत. या सर्वोच्च पदांवर नियुक्त करावयाची नावे जवळपास निश्चित झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भडगाव येथे माजी जि प सदस्य प्रदीप पवार आणि अमळनेरचे शहराध्यक्ष मनोज पाटील हे कार्याध्यक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी जि प सदस्य प्रभाकर सोनवणे व मुक्ताईनगर चे डॉ. जगदीश पाटील यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. जळगाव शहर महानगरअध्यक्ष पदावर मनोज चौधरी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत ज्ञानेश्वर कोळी आणि जाकिर बागवान यांना कार्याध्यक्ष पद सोपवले जाणार आहे. तसेच जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्याकडे असलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी रावेरचे राजीव रघुनाथ पाटील यांना सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.