जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेली दोन वर्षे वादग्रस्त ठरलेल्य एलईडी बसवण्याच्या ठेक्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरात १७४०० नवीन एलईडी बसवण्यात आल्या आहेत. यासाठी १२५ ठिकाणी सेंट्रल कंट्रोलिंग मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नादुरुस्त एलईडीची माहिती बसल्या जागीच मिळणार आहे.
स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून पथदिवे सुरू व बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी दोन महिन्यात किती विजेची बचत होते याचा लेखाजोखा तयार होणार आहे. देशभरात वीज बचतीचे धोरण राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शहरी भागात ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून एलईडी बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एलईडी योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. दरम्यान एलईडी लावण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. पुढील सात वर्षापर्यंत या कंपनीमार्फत योजनेची देखभाल, दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
सुरुवातीला कंपनीच्या माध्यमातून जेथे दिसेल तेथे एलईडी लावले जात होते. रस्त्यांची रुंदी, चौक, कॉर्नर आदींचा विचार करून सर्वेक्षणानंतर त्याचा निर्णय होणे अपेक्षित होते. त्यामुळे नव्याने डीपीआर तयार करण्यात आला. त्यात शहरात १५५०० एलईडी बसवण्याची मागणी महापालिकेने केली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरात कंपनीकडून काम करण्यात आले. मागणीपेक्षा जास्त १७४०० एलईडी लावण्यात आले आहेत.