मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण कसे टिकवायचे याबाबत चर्चा झाली. स्वतः देवेंद्र फडणवीस यंनी यासंदर्भात माहिती दिली.
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण परत मिळवणे शक्य असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, त्याचे आम्हाला राजकारण करायचे नाही. मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही कशा रीतीने इम्पेरियल डेटा जमा केला जो सर्वोच्च न्यायालयानेही ग्राह्य ठरवला आहे. याबाबत चर्चा केली. आता ही आपल्याला तो कसा जमा करता येईल, हे आपण छगन भुजबळ यांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.