जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील एम. जे. कॉलेज जवळील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अनंत जोशी यांनी केली आहे.
यासंदर्भात मनपाचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १२ मधील एम. जी. कॉलेज परिसरातील तसेच रामदास कॉलनी ओपन स्पेस लगत संरक्षक भिंतीसाठी गेल्या पंचवार्षिकतेत केलेला पाठपुरावा करून आपण निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु संबंधित मक्तेदाराने हे काम पूर्ण करण्यास तीन वर्षाचा कालावधी लावला. तरी देखील सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कारण रामदास कॉलनी जवळील संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण झाल्याच्या महिन्याभरातच दि. १३ जुलै २०२१ रोजी ढासळलेला असून परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे रोष व्यक्त केला आहे. असे असल्याने प्राप्त निधीचा योग्य वापर करणे अपेक्षित असताना संबंधितांनी दर्जा टिकवला नाही. ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून आपण संबंधित कामाबद्दल अभियंता यांना सूचना केल्या होत्या. तरी देखील त्याकडे लक्ष्य करण्यात आले नाही. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित मक्तेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मक्तेदारांना बिल अदा करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.