(मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा) शहरातील भुसावळ रोडवरील कोर्ट जवळ राहणारा विशाल ठोसरे या युवकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वामन ठोसरे या युवकाच्या बहिणीचे ४ वर्षांपूर्वी यावल तालुक्यातील चुंचाळे येथील विजय सावकारे यांच्याशी विवाह झाला होता. दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते. मात्र मध्यंतरी सलोखा निर्माण झाल्याची माहिती मिळते.
दरम्यान विजय सावकारे याने काल चुंचाळे येथे सासरवाडीला येऊन गोंधळ घातला होता. गोंधळानंतर विशाल ठोसरे आपल्या कुटुंबासोबत झोपला असता पहाटे त्याच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. दरम्यान विजय सावकारे हा घरात आढळून न आल्याने त्याच्यावर खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संबंधित पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.