(राजमुद्रा जळगाव) शहरातील शिवाजीनगर पुलाचा वाद गेल्या अडीच वर्षांपासून नागरिकांना त्रस्त करत आहे. शासकीय मान्यतेनुसार पुल T आकाराचा व्हावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक व काही नागरिक करत आहेत. मात्र ज्या भागातून टी आकाराच्या पुलाचे बांधकाम जाणार आहे त्या नागरी वस्तीतील नागरिकांचा या पुलाला विरोध दिसून येत आहे.
स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पूल T आकाराचा व्हावा यासंदर्भात ऑनलाइन मतदान करून नागरिकांची संमती मिळण्यासंदर्भात प्रयत्न केले होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी ही ऑनलाइन मतदान पद्धती सपशेल खोटी व चुकीची असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना दिली आहे. त्यांनी प्रत्यक्ष संगणकावर हि नोंदणी कशाप्रकारे खोटी आहे याचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.
या मतदानाला कोणत्याही प्रकारची विश्वसनीयता नसून कोणतीही व्यक्ती या ऑनलाईन मतदानाद्वारे आपले नाव व मोबाईल क्रमांक टाकून मतदान नोंदवू शकतो. दीपक कुमार गुप्ता यांनी देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने ऑनलाईन मतदान करून या मतदानाच्या खोटेपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. यावर नोंदणी करायची झाल्यास कोणतीही व्यक्ती आपली खोटी माहिती टाकून ही नोंदणी सहज करू शकतो. या मतदानात कुठल्याही प्रकरची सत्यता नसून नगरसेवक चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत असल्याचे दीपक कुमार गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.