(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजपातील सत्तावीस बंडखोर नगरसेवकांना राजकीय ग्रहण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बंडखोर नगरसेवकांनी गटनेतेपदी ऍड दिलीप पोकळे यांची तर प्रतोद म्हणून उपमहापौर कुलभूषण पाटील यांची निवड केली आहे. तसेच चारही प्रभाग समिती सभापतींची निवड केली. ही निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करून भाजप गटनेते भगत बालाणी यांचा व्हीप नाकारल्याने बंडखोरांविरुद्ध भाजपाने औरंगाबादच्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकाराने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या सत्तावीस बंडखोरांविरुद्ध अपात्रतेसाठी भाजपाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आज भाजपाचे काही नगरसेवक औरंगाबाद खंडपीठाकडे रवाना झाले आहेत. भाजपाचे गटनेते भगत बालाणी आणि स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या बंडखोर नगरसेवकांनी भाजपचा व्हीप नाकारून स्वतः गटनेतेपदी दिलीप पोकळे यांची तर प्रतोद म्हणून कुलभूषण पाटील यांची निवड केली होती. तसेच चारही प्रभाग समिती सभापतींची निवड प्रक्रिया त्यांनी राबवली. या सर्व बाबी बेकायदेशीर असल्याचा ठपका भाजपाने ठेवला असून, या बंडखोरांविरुद्ध अपात्रतेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान या घटनेनंतर शिवसेना काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून असून या प्रकरणी काही नगरसेवकांमध्ये धास्तीचे वातवरण पसरले आहे.