(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) देशभरात शिक्षणसम्राटांची कमी नाही. स्वतःच्या फायद्यासाठी पालकांकडून डोनेशन घेणे, फीसाठी पालकांना अडवणूक करणे, निकाल रोखणे असे प्रकार आजही घडताहेत. मात्र मेहरूण भागातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ ही संस्था याला अपवाद ठरली असल्याची माहिती या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.
दरम्यान हि संस्था विना अनुदानित असतांनाही संस्थेने कोणत्याही विद्यार्थ्याकडून फी न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. विद्यार्थांकडून कोरोना महामारीमुळे सामान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली असताना एक नवीन आदर्श निर्माण करण्यात आला. २०२०-२१ वर्षाची पालकांकडून कुठलीही फी न घेण्याचा निर्णय येथील संस्थाचालकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे संस्थेची विद्यालये ही विनाअनुदानित आहेत. त्यामुळे राज्यभरातून संस्थेचे कौतुक होत असल्याचे सांगण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळच्या संचालकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने संस्था अध्यक्ष तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, उपाध्यक्ष शामकांत सोनवणे उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला मागील इतिवृत्त व संस्थेची प्रस्तावना सचिव मुकेश नाईक यांनी केली. कोरोना महामारीमुळे मेहरूण परिसरात आलेले संकट आणि पालकांची आर्थिक स्थिती यावर विचारविनिमय करून चर्चा झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश मामा नाईक यांच्या आठव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन शालेय विद्यार्थ्यांची सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची १०० % फी माफ करून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.
तसेच, आगामी काळात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याविषयी देखील नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी संचालक संदीप आंधळे, राजेंद्र सानप, युवराज सानप, नरेंद्र नाईक, एकनाथ वंजारी, सिंधूबाई आंधळे, अर्चना नाईक यांच्यासह मुख्याध्यापिका शीतल कोळी, वासुदेव सानप, रमेश चाटे, उज्वला नन्नवरे उपस्थित होते.
कोरोना या जागतीक महामारीमुळे लोकं जगण्यासाठी व कुटुंबाला जगवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशातच बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी फी भरा अन्यथा निकाल, वह्या पुस्तके न देणे, ऑनलाईन शिक्षण बंद करणे अशी जबरदस्ती पालकांवर केली आहे. अशा वेळी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थेने मोठे मन करून विद्यार्थ्यांना १००% टक्के फी माफ करून फक्त जळगाव शहरच नव्हे, राज्यालाच नव्हे तर देशाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयाचे रंगकाम अजून बाकी आहे. विशेष म्हणजे संस्थेची विद्यालये ही विनाअनुदानित आहेत.
सध्या जगभरात कोरोना महामारी सुरु आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश पालकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक नाही. कोरोनामुळे वैद्यकीय खर्चाला पैसे संपले हे सर्व आम्ही आजही पाहत आहोत. अशा वेळी त्यांना धीर देणे महत्वाचे आहे. त्यामुळे अवास्तव फी आकारण्याच्या जमान्यात संस्थेने सामाजिक जाणीव कायम ठेवून या वर्षाला कोणत्याच विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. पैसे कमवण्याचा हेतू न ठेवता विनाअनुदानित असूनही संस्थेला येणारा आर्थिक भार संचालक मंडळ स्वतः पेलणार आहे.