(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) महापालिकेत शिवसेनेने सत्तांतर घडविल्यानंतर आता बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने पालिकेतील बहुचर्चित नवग्रहांपैकी एक ग्रह सध्या चर्चेत आहे. कारण बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होण्याच्या भीतीपोटी या उच्चपदस्थ एका नवग्रहाने न्यायालयात सर्वांची बाजू ठामपणे मांडण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असणे आवश्यक आहे असे सांगितल्याने या एका ग्रहाच्या आदेशावरून बंडखोर नगरसेवकांमध्ये आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी कुजबूज सुरू झाली आहे.
नाशिक, मुंबई, औरंगाबाद खंडपीठ येथे जाण्यासाठी आणि तेथे दाखल होणाऱ्या याचिकेबाबत सुनावणीसाठी चांगला, उत्तम दर्जाच्या अभ्यासपूर्व वकिलाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याने बंडखोर नगरसेवकांमध्ये यावर विचार विनिमय सुरु झाला आहे. दरम्यान एक नवग्रहाने संबंधित नगरसेवकांकडून आर्थिक बाजू भक्कम असावी म्हणून काही ‘माया’ची जमवाजमव सुरू केली आहे. या प्रकाराने शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चर्चेला उधाण आले असून भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या आणि शिवसेनेत आधीपासून असलेल्या नगरसेवकांमध्ये यावरून ‘माया द्यावी की देऊ नये?’ यावर चर्चा सुरू झाली आहे. तर काही नगरसेवकांनी ठाम निर्णय घेऊन असहकाराची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जे नगरसेवक फुटले आहेत त्यांना काही प्रमाणात लक्ष्मीचा लाभ झाला. मात्र काही नगरसेवकांनी यापासून लांब राहणे पसंत केले. त्यामुळे त्या नगरसेवकांचा याला विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडणारे वकील असावे, यासाठी मात्र मोठी वकिलांची फौज लावावी लागेल. त्यासाठी आर्थिक कणा मजबूत असणे गरजेचे आहे. त्याकरिता या नवग्रहांपैकी एक ग्रहाने पुढाकार घेऊन संबंधित नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना तशा सूचना केल्या आहेत.
आगामी निवडणुका लक्षात घेता कुठल्याही परिस्थितीत महापालिकेतून शिवसेनेची सत्ता कायम राहावी यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने नियोजन आणि विकासकामांवर भर देण्यात आला आहे. मात्र काही नगरसेवकांच्या नाराजी नाट्यामुळे पुन्हा हा विषय चर्चेचा ठरणार आहे.