(राजमुद्रा वृत्तसेवा) देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात रोज हजारो नागरिकांचा कोरोनामुळे बळी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गृह विलगीकरण रुग्णांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. रुग्णालयातील बेड तसेच ऑक्सिजन यांची कमतरता पाहता गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र आता यात केंद्राकडून नवे नियम लागू करण्यात आले असून त्यांचे पालन करणे गरजेचे राहणार आहे.
काय असतील नवे नियम
● ज्या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे त्या रुग्णांना स्वतंत्र खोली तसेच स्वच्छतागृहाची सोय असणे गरजेचे आहे.
●घरात असताना सुद्धा या रुग्णांना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे.
●साधा मास न वापरता तीन पदरी वैद्यकीय मास वापरावा अशी सूचना करण्यात आली आहे.
●वृद्ध व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवायचे असल्यास डॉक्टरांची तशी परवानगी लागणार आहे.
●गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीची काळजी घेण्याकरिता एक स्वतंत्र व्यक्ती पूर्ण वेळेसाठी असणे आवश्यक असणार आहे.
●ज्या रुग्णांना त्रास होत नसेल अशा व्यक्तींची गृहविलगीकरणाची मर्यादा दहा दिवसांची असणार आहे त्यानंतर गृहविलगीकरणात सूट मिळणार आहे.
देशात सध्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय विभागांमध्ये कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहेत. कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारतर्फे नवीन नियमावली जाहीर करून रुग्णांच्या बरे होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.