(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वारे सुरू झाले आहेत. बदल्यांसाठी काही राजकीय नेत्यांच्या नावांचा वापर करीत असल्याने नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासन आदेशानुसार ही प्रक्रिया १६ जुलैपासून सुरू करण्यात आली. वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यापूर्वीच अनेक कर्मचाऱ्यांनी सोयीच्या बदल्या करून घेण्यासाठी दिव्यांगाचे खोटे सर्टीफिकीट काढले असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात खोटे सर्टीफिकीट काढून देणारी टोळी सक्रिय असल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात प्रशासनाने जागृत राहून लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी, यापूर्वी खोटे दिव्यांगाचे प्रमाणपत्र जमवून त्या माध्यमातून सोयीच्या बदलीचा लाभ घेतल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र त्याची चौकशी प्रशासनाकडून होत नसल्याने ‘यावेळी देखील असाच प्रकार होतो काय?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी याबाबत जागरूक राहून सूक्ष्म नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दलालांच्या त्रासापासून मुक्तता होणार आहे.
बदलीसाठी हे सर्टिफिकेट सादर केल्यानंतर त्यांची पडताळणीच केली जात नसल्याने या कर्मचाऱ्यांचा दरवर्षी बदल्यांमध्ये पेव फुटत आहे. प्रशासनाकडून पाहिजे तशी कारवाई होत नसल्याने बदलीसाठी दिव्यांगाचे खोटे सर्टीफिकीट सादर करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी घेऊन त्यांच्या सर्टीफिकीटची वैद्यकीय बोर्डाकडून कसून तपासणी केली जावी अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे. तसेच बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व विभाग प्रमुख तसेच पंचायत समिती कडून संवर्गनिहाय बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.