(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात दबदबा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे राजकारण सुरू झाले आहे. पुणे येथील भोसरी भूखंड प्रकरणी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा परिणाम जिल्हा दूध संघाच्या राजकारणावर देखील झाला आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंदाताई खडसे यांनी काही दिवसांची रजा घेतल्याने त्यांच्या ऐवजी दूध संघाच्या अध्यक्षपदी ॲड वसंतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, दूध संघाची निवडणूक काही महिन्यात केव्हाही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु त्याआधीच दूध संघाचे अध्यक्ष मंदाताई खडसे यांनी रजा घेतल्याने अध्यक्षपद ॲड मोरे यांच्याकडे सोपविले आहे. गेल्या निवडणुकीत दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या नेतृत्वाखाली दूध संघात सत्ता मिळवून दिली. अध्यक्षपदी मंदाताई खडसे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु पाच वर्षाच्या बदललेल्या राजकारणात सद्यस्थितीत एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत आपले पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच भोसरी प्रकरणामुळे नुकतीच त्यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. या प्रकरणी मंदाताई खडसे यांच्या चौकशीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीव दूध संघात देखील फेरबदल करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहकारी संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात, अशा परिस्थितीत आपली अडचण टाळण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. ॲड वसंतराव मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली असली तरी जिल्ह्यातील सहकारात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ‘एवढ्या कमी दिवसात मोरे काय चमत्कार घडवितात..!’ याकडे सहकार विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.