(भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा) येथील घोडेपिर बाबा रस्त्यावरील फर्निचरच्या गोदामात सुरू असलेला गावठी दारू बनवण्याचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन दिवसांपूर्वीच उध्वस्त केला होता. फर्निचर गोदामाची जागा भुसावळातील रवींद्र ढगे यांची असल्याने त्याचा संबंध थेट आमदारांचा कार्यकर्ता असा जोडून आमदार संजय सावकारे यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली होती.
या प्रकरणी आमदारांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेता तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर, बबलू खान, राज किरण प्रधान, किरण विसे, उमेश चौधरी यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसात भा.द.वि ५०० व ५०१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कंक हे करीत आहेत.
भुसावळात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला अवैध दारूच्या कारखान्यावर पुण्याच्या भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागासह स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.