(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचालींना सुरूवात झाली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातून विस्तारित मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी आपली मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक आमदारांनी पक्षश्रेष्ठींचा सोबत संधान साधले असून, आपण केलेल्या कार्याची दखल घ्यावी, म्हणून काही कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे रिक्त असलेले दोन्ही मंत्रीपद भरण्याबाबत दोन्ही पक्ष सध्या अनुकूल आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला एक मंत्रीपद रिक्त आहे, तर संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे ही मंत्रीपद रिक्त आहे. काँग्रेसनेही आपल्या मंत्र्यांमध्ये फेरबदलाच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल महाविकास आघाडीत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. यात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री असलम शेख यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान या संभाव्य मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस कडून कोणत्या आमदारांची वर्णी लागते यासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.