(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) भोसरी येथील बहुचर्चित भूखंड खरेदी प्रकरणी ताब्यात असणारे गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी २६ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर खडसे यांची ईडी चौकशी करण्यात आली, तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता.
दरम्यान ईडीच्या कोठडीत असलेल्या गिरीश चौधरी यांना सुरुवातीला पाच दिवस त्यानंतर व त्या नंतर आणखी चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आज गिरीश चौधरी यांची कोठडी संपत असल्याने त्यांना पी एम एल ए कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना २६ जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. तपास अद्याप पूर्ण न झाल्याने ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली आहे. न्यायाधीश एस एच गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे.