(राजमुद्रा वृत्तसेवा) गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण विश्वात आपले थैमान घेतले आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची जी भीती लोकांमध्ये दिसून येत होती ती भीती दुसऱ्या लाटेत कमी झाल्याचे निदर्शनात येत आहे. याचा परिणाम म्हणून पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते. सोबतच कोरोना रुग्णाचा मृत्यू हा माणुसकीला एक प्रकारे काळिमा फासणारा म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये लॉकडाऊन हा एक पर्याय सुचवला गेला. एकमेकांच्या संपर्कात न येण्यातून कोरोनाचा संसर्ग रोखता येतो. भारतासारख्या उष्ण देशामध्ये हवेतून कोरोना पसरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते, कारण उष्ण वातावरणात नाकावाटे निघणारी हवा उष्णतेमुळे वाफेत रुपांतरीत होते. जर यामध्ये कोरोनाचे विषाणू असले तर झपाट्याने पसरून आपला परिणाम दाखवतात असा अंदाज मध्यंतरी तज्ञांनी दिला होता. भारतात उन्हाळ्यामध्ये 40 च्या वर तापमान जाणे ही सर्वसामान्य बाब आहे. त्यातल्यात्यात महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, अकोला, लातूर, बीड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमान सहज 45 पार होते.
शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध हे एक प्रकारे उन्हापासून बचाव करण्यास नागरिकांची मदत करत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी काही नागरिक मात्र विनाकारण भर दुपारी रस्त्यांवर फिरत असल्याचे आढळतात. प्रसंगी यांना पोलिसांकडून प्रसादही खावा लागतो मात्र तरीही गेल्या दीड वर्षापासून कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन लागू असतानाही ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांनी शासनाचे नियम पाळून जर आपले दिवस घरात घालवले तर उन्हाच्या तडाख्यापासून तसेच कोरोनापासून सहज आपला बचाव होऊ शकतो. ही परिस्थिती कायम राहणारी नसली तरी यंदाच्या उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या लाटे पासून वाचण्यासाठी लॉकडाऊन हा एक उत्तम पर्याय म्हणता येईल.
तापमान वाढ ही जागतिक समस्या होत चालली आहे. त्यातच कोरोना ही दुसरी जागतिक आपत्ती त्याला मोठ्या प्रमाणावर साथ देत असल्यामुळे नागरिकांसह आरोग्य प्रशासन आणि सरकारही हतबल झाले आहे. अशा वेळी नागरिकांनी घरीच राहून ऊन आणि कोरोना या दोघांपासून स्वतःला सुरक्षित ठेवले तर येणारा भविष्यकाळ हा नक्कीच चांगले काहीतरी घेऊन येण्याची आशा निर्माण होते. आयुष्य हे खूप मोलाचे आहे. त्यातील दोन वर्षे वाया गेली म्हणजे संपूर्ण आयुष्य संपले असे मुळीच नाही. ‘जान है तो जहान है’ या उक्तीप्रमाणे स्वतःचा बचाव हा सर्वात महत्वाचा आहे. त्यासाठी लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास नुकसानाऐवजी शरीराचा फायदा होऊन आपला जीव वाचवता येऊ शकतो यात शंका नाही.