(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) आगामी होणार्या विधानसभा, विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले नसले, तरी आतापासूनच काही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस या पक्षातील दिग्गज नेत्यांनी अद्याप आपापले इच्छुक उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र निवडणूक विषयी विविध चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेत सध्या शिवसेना पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. त्या दृष्टीने सेनेच्या अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांना ‘आमदारकीची’ स्वप्ने पडू लागली आहेत. स्वप्न पाहणे चांगली गोष्ट आहे, त्यात चुकीचे असे काहीच नाही; परंतु हे स्वप्न पाहत असताना आपल्या उमेदवारीचा फैसला ‘जनता’ करणार, हे त्यांनी विसरू नये.
शिवसेनेचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी जळगावात नुकतेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. काही नागरिकांनी धाव घेऊन संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहेत. त्या दृष्टीने नितीन लढ्ढा यांनी देखील शहरात पुन्हा जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. महापालिका हे नागरिकांच्या विविध अडचणी मार्गी लावण्याचे मोठे साधन आहे. त्याची इत्यंभूत माहिती नितीन लढ्ढा यांना अवगत आहे. शिवसेनेने आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून ही राजकीय खेळी खेळली आहे. कारण, पालिकेचे तत्कालीन माजी महापौर तथा उच्चाधिकार समितीचे सर्वेसर्वा प्रदीप रायसोनी आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या तालमीत नितीन लढ्ढा हे तयार झालेले आहेत. त्यांची दूरदृष्टी व पालिकेतील सर्व घडामोडींवर असलेले बारीक लक्ष या बाबी देखील विचारात घेतल्या पाहिजे. या सर्व घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे पडद्यामागील ‘खरे सूत्रधार’ वेगळेच आहेत. ते अद्याप जनतेसमोर आलेले नाहीत.
पक्षाने केवळ चाचपणी सुरू केली आहे. ‘जनतेचा कौल काय आहे’ हे ओळखून पुन्हा नव्याने डावपेच खेळले जाणार आहेत. त्यातच विधान परिषद निवडणूक देखील तोंडावर आली आहे. विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांचा कार्यकाळ एक वर्षाचा राहिला आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या जागी महापालिकेचे विरोधी पक्षनेते ‘सुनील महाजन’ यांना विधान परिषदेवर निवडून पाठवण्याचा खटाटोप सुरू असल्याचे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सुनील महाजन यांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, शिवसेनेत अंतर्गत असलेली ‘गटबाजी’ आणि ‘विरोधकांची राजकीय खेळीनंतर’ काय निर्णय घेतला जातो त्यावर सर्व काही अवलंबून आहे.
पक्षश्रेष्ठींनी अद्याप आपले राजकीय पत्ते फेकलेले नाहीत. केवळ राजकीय मायाजाळ पसरविलेला आहे. पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयानंतरच ‘आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार’ हे चित्र दिसून येणार आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, संजय सावंत यांच्या भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे सेनेत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यातच जळगाव शहराचे भाजपाचे आमदार ‘राजूमामा भोळे’ यांनी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘शहराचा विकास जर करायचा असेल, तर सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रपणे काम केले पाहिजे. केवळ विकासाच्या नावाने कागदी घोडे नाचवून चालत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.’ असा टोलाही आमदार भोळे यांनी लगावला आहे. तसेच ‘निवडणुकीत जेवढी जास्त इच्छुकांची भाऊगर्दी होते, तेवढे चांगले आहे. कारण, अंतिम निर्णय हा जनता जनार्दनाचा असतो. त्यांच्या आशीर्वादानेच आमदार निवडला जातो, हे देखील लक्षात घेतले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
या सर्व धावपळीत शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मात्र आपल्या ‘पत्नीला’ महापौरपद मिळावे म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या धडपडीला ‘किती यश येते?’ हे देखील काळच ठरवणार आहे. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘आर्थिक तरतूद’ देखील करावी लागणार आहे, हे विसरून चालणार नाही. कारण सध्या महापौरपद मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने लक्ष्मीची गरज असते हे सर्वश्रुत आहे हे त्यांनीही लक्षात घेतले पाहिजे.
विशेष म्हणजे विधानसभेसाठी जळगावमधून पालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी देखील मुंबईत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन उमेदवारीसाठी मोर्चे बांधणीस सुरुवात केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारण पालिकेत सत्तांतराच्या वेळी पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परिणामी त्यांनी देखील ‘तरुण चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून’ राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्फत प्रयत्न सुरु केले आहेत.