(जळगाव राजमुद्रा) कोरोना काळात सबंध महाराष्ट्रात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बालक आपापल्या घरांमध्ये एकटेपणाचं आयुष्य जगत असल्याचं दिसून येत आहे. दिव्यांग बालकांचा परिवारही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीमुळे हतबल झाला असून दोन वेळच्या जेवणासाठी प्रतीक्षेत असल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यूतर्फे जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभर पुरेल असा किराणा भेट देण्यात आला.
दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या पोस्टल कॉलनीतील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात औपचारिकता म्हणून काही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, बाळू चौधरी, विनोद शिरसाळे, जयश्री पटेल, अनिता पाटील, सोनाली भोई, लक्ष्मी वाघ, वनिता पवार आदी उपस्थित होते.
शहरातील गरजू दिव्यांग बालकांच्या परिवाराला किराणा वाटप केल्यावर उर्वरित किराणा किट शिरसोली, चाळीसगाव येथील बालकांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यू व श्यामश्री भोसले यांचे सदर उपक्रमासाठी सहकार्य लाभले असून लॉकडाउन असेपर्यंत उडाणच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना मदत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, डाळ, चहा, साखर, तिखट, हळद, तेल, साबण, कांदा, बटाटे, टूथपेस्टचा समावेश आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून सर्वच नागरिकांची हलाखीची परिस्थिती असताना दिव्यांग पाल्य व त्यांच्या परिवारावर काय अवस्था येत असेल याचा फक्त विचार करता येऊ शकतो.