जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख आणि मनोज वाणी यांनी आपल्या संकल्पनेतून अजितदादा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी जाहिरात तयार केली. ही जाहिरात त्यांनी प्रत्यक्ष अजितदादा पवार यांना आज मुंबईत दाखवली. ती जाहिरात त्यांना अत्यंत आवडली असून, त्यांनी कौतुकाने दोघांची पाठ थोपटली त्यामुळे या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख व मनोज वाणी यांनी तयार केलेली ही जाहिरात सध्या लक्षवेधी आणि लोकप्रिय ठरली आहे. या जाहिरातीत त्यांनी म्हटले आहे की, ‘त्या शपथविधीमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात दादांच्या ‘निष्ठे’ बद्दल शंका उत्पन्न झाली होती. मात्र आम्ही ठाम होतो. दादा एक वेळ राजकारण सोडतील पण साहेबांवरील निष्ठा कधीच सोडणार नाही.’ अजितदादा पवार यांना ‘ही’ जाहिरात फार भावली असून त्यांनी याचे कौतुक केले आहे.
‘अजितदादा पवार हे प्रत्येक शब्दाला जागणारे, एकनिष्ठ नेते असून त्यांनी सर्वसामान्य जनतेची अपेक्षापूर्ती केली आहे. राजकीय जीवनात नेता आणि वेळ यांचे फारसे जुळत नाही. अनेक नेते दिलेल्या वेळेपेक्षा कार्यक्रमास उशीरा येत असतात, मात्र त्याला अजितदादा पवार अपवाद आहेत’, असे सांगून विनोद देशमुख म्हणाले, ‘आपल्याला त्यांचा हा अनुभव आला आहे. अजितदादांकडे कामानिमित्त भेट घेणे महत्त्वाचे होते. अशा धावपळीतही त्यांनी वेळ दिला आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. एकनिष्ठ, दिलेला शब्द पाळणे अशी त्यांची ख्याती आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात सत्तांतराच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाशी हातमिळवणी करून त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत पहाटे शपथविधी घेतला होता. या अचानक झालेल्या घडामोडींमुळे राजकारणात खळबळ माजली होती. ‘आता अजितदादा पवार ‘शरद पवार’ यांच्यापासून लांब जाणार’ असे चित्र रंगवण्यात आले होते. परंतु या सर्व घडामोडींवर मात करीत त्यांनी आपला दिलेला शब्द आणि निष्ठा पाळली. ते राष्ट्रवादीतच राहिले. त्यांनी शरद पवार सांगतील त्याप्रमाणे राजकारण केले आणि बघता बघता महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडीची’ सत्ता आली.
आता त्यांनी पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली आहे. त्यांची ही राजकीय निष्ठा पाहून कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करीत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ‘परमेश्वर दीर्घायुष्य देवो’ ही शुभेच्छा दिली आहे.