चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील डॉ आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली डॉ बाबासाहेब यांचे १९५८ या वर्षाचे २ अस्थीकलश मिळाले असून, त्या अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स पो नि विशाल टकले, निसार सैय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, तलाठी यांनी भेट देऊन माहिती घेतली.
चाळीसगाव शहरात नगरसेविका सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी काम सुरू आहे. आज दि २२ जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास १० फूट खाली काँक्रीट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी असलेले २ अस्थीकलश मिळून आले. ही माहिती नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, माजी आमदार साहेबराव घोडे, नगरसेवक रामचंद्र जाधव, बबलू जाधव, गौतम जाधव यांना मिळताच सर्वांनी त्याठिकाणी येऊन विधीवत पूजन करून अस्थीकलश बाहेर काढले. एका अस्थी कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या कलशावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख आहे.