मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर यांच्या कुटुंबियांवर एका पतसंस्थेचे असलेले १९.९५ लाखांचे संपूर्ण कर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने फेडण्यात आले. यासाठी चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या ३ महिन्यांच्या मानधनातून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दि.२२ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्याहस्ते व विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने लोणकर कुटुंबियांना १९.९५ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, चाळीसगाव पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते. एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या ३ महिन्यांच्या आमदारकीच्या मानधनातून कर्त्या मुलगा गेल्याचे दुखः असणाऱ्या लोणकर कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ग्रामीण भागातील व परिस्थितीचे चटके सोसलेला तरुण आमदार या नात्याने सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणून पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर यांच्या कुटुंबियांना मदत केली. यामाध्यमातून राज्यातील हजारो स्वप्नील यांना संदेश द्यायचा आहे की, आत्महत्यासारखे टोकाचे पाउल हा काही पर्याय नाही होऊ शकत, आपल्यामागे कुटुंबियांची होणारी अवस्था, समाजात जाणारा संदेश हे सर्व चित्र खूप विदारक आहे. संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, सर्व पक्ष, आमदार – खासदार MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, माझी सर्वाना विनंती आहे की, काही अडचण असल्यास आम्हाला सांगा मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका.
ते पुढे म्हणाले की, या आत्महत्येला सरकारचा कारभार जबाबदार आहे अशी भावना युवा वर्ग व्यक्त करु लागली आहे. स्वप्नील सारख्या एमपीएससी केलेल्या आणि करु इच्छिणा-या शेकडो युवकांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. MPSC चा अभ्यास करणारी मुलं रिकामटेकडे म्हणून पुस्तकं घेऊन बसलेली नसतात. भविष्यातले होणारे देशाचे प्रशासक असतात. एखादा पेपर सोडवला आणि पोस्ट मिळाली म्हणजे MPSC नसते. त्यासाठी अनेक शानशौकींना त्यांनी मुरड घातलेली असते. रात्रीचा दिवस करुन केलेले असते. MPSC ची परिक्षा पास होऊन अधिकारी म्हणून पदभार स्विकारेपर्यंतचा पल्ला खूप मोठा- लांबलचक असतो. पूर्व व मुख्य परिक्षा पास होऊन ३-३ वर्षे मुलाखत होत नसेल, नोक-या मिळत नसतील, तर पोरं जीव देतील नायतर काय?