जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत एकनाथ खडसे यांना मंत्रिपद का दिले नाही?’ असा सवाल माजी मंत्री तथा भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव येथे केला आहे.
भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा नाही. उद्या मी अथवा इतरांनी कोणी काही निर्णय घेतला, तर असे नेते जाऊन काही पक्ष संपत नसतो. पक्ष हा जागेवरच राहतो. तो चालत राहतो,’ असे सांगून त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय केलेला नाही. कारण त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करेल एवढी भाजपामध्ये कुणाची हिम्मत नव्हती, असेही त्यांनी सांगितले. खडसे यांचा सर्व प्रकारचा मानसन्मान केला जात होता. ते एक ज्येष्ठ नेते होते. खडसे यांच्यापेक्षाही कोणी मोठा नेता पक्ष सोडून गेला असला, तरी पक्षाचे काहीही नुकसान होत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.