जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध कॉलन्या व परिसरातील रस्त्यांवर अमृत आणि भुयारी गटार योजनेसह विविध कामांमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.
शहरात अनेक कॉलन्यांमध्ये अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहे. परंतु काम झाल्यानंतर संबंधित त्यावर योग्यप्रकारे दुरुस्ती, खड्डे बुजवा बुजव करीत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत महापालिका अभियंत्यांनी तातडीने शहरातील खड्डे दुरुस्त करण्याबाबत आदेश दिले आहेत.
महापौरांच्या दालनात झालेल्या या बैठकीत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. बांधकाम अभियंते, प्रभाग समित्यांचे अधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना हे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रसंगी शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, प्रभाग अधिकारी संजय पाटील, मनिष अमृतकर, योगेश वाणी, प्रकाश पाटील, मिलिंद जगताप आदी उपस्थित होते.