जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजाराची जागा ही ११७ व्यावसायिकांना ९९ वर्षासाठी भाडेकरारावर देण्याचा ठराव १९९७ मध्ये झाला होता. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला नसल्याने या ठरावाला मान्यता मिळू शकलेली नाही. प्रशासनाने केलेल्या चुकीचा फटका भंगार बाजारात बाजारातील दुकानदारांना बसत आहे. नगरपालिकेने केलेल्या ठरावानुसार हा करार ९९ वर्षाचा असल्याची माहिती शहर भंगार बाजार कृतिसमितीने दिली आहे.
तत्कालीन नगरपालिकेने या ठिकाणच्या व्यावसायिकांसाठी सदर मोकळी जागा दिली होती. तसेच ही जागा अपूर्ण पडत असल्याने खाजगी जागा घेऊन व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक वर्षापासून ११७ दुकानदारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या दुकानांमुळे सुरू आहे.
निवेदनावर प्रा. डॉ. कलीम सालार, वाहाब मलिक, फिरोज खान, शाकीर खान, रशीद खान, अकबर खान यांच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान भंगार बाजार ताब्यात घेण्याबाबत प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महासभेने तीन जणांची समिती नेमली होती. मात्र या समितीच्या सदस्यांनी कोणताही अहवाल पालिकेकडे न देता महासभेत बेकायदेशीर अहवालावर ठराव मंजूर करण्यात आला. पालिकेने जुना ठराव शासनाकडे रद्द करण्यासाठी पाठवला असून नवीन ठराव मंजुरीसाठी पाठवला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून याबाबत भंगार बाजार कृती समितीने शासनाकडे दाद मागितली आहे.