मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भोसरी येथील बहुचर्चित भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. दरम्यान मंदाताई खडसे यांना दि. २७ जुलै मंगळवार रोजी ईडीच्या पथकाने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना धक्का बसल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या चौकशीची व्याप्ती वाढणार असून मंदाताई खडसे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भोसरीच्या भूखंड प्रकरणाची ईडीच्या माध्यमातुन खडसे कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. यात जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे, तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची देखील ९ तास चौकशी करण्यात आली होती. आता याच प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरीत्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला होता. गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे कुटुंबीयांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे आधीच मानले जात होते.
मंदाताई खडसे यांना ७ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्यांनी १४ दिवसांची वेळ मागितल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मधल्या काळात त्यांच्या चौकशीची शक्यता कमी होती. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मंगळवारी (ता. २७) कार्यालयात हजर राहण्याबाबत सांगितल्याचे विश्वसनीय वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.