चिपळूण राजमुद्रा वृत्तसेवा | ”सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे. चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”मी एवढच सांगतो आहे की, सुरूवातीला आम्ही तातडीची मदत करतच आहोत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते, पूल देखील वाहून गेले आहेत, मोठं नुकसान झालं आहे. पिकाचं नुकसान झालेलं आहे आणखी काही नुकसान झालं असेल, या सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन, आपण जे करता येणं शक्य आहे व जे करणं आवश्यक आहे ते सर्व करू.”
”दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तत्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं.
तसेच, ”मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचनादेखील मी प्रशासनाला केल्या आहेत.यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच, पण ते अधिक सक्षम करू.” असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.