राजमुद्रा वृत्तसेवा | अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळण्याचा घटना घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी आणि मालमत्तेचंही नुकसान झालं. पावसाने उसंत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “राज्य सरकारची लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत”, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. यावर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.
“आपण विरोधकांच्या टीकेवर लक्ष केंद्रीत केलं तर आपण काहीच करू शकणार नाही. आता आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणं गरजेचं आहे. लोकांच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे”, असं उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या. एकदा संपूर्ण आढावा आला की आर्थिक मदत देखील दिली जाईल असे आश्वासनही यावेळी दिले.