जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्ह्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीवर शिवसेनेचाच दावा राहणार असून, तिकीट कुणाला मिळो, यश मात्र आमचेच राहणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले आहे.
जळगावात शिवसंपर्क अभियान सुरू झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. विष्णू भंगाळे म्हणाले, ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान जोमाने सुरू आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी मेळावे, बैठका घेण्यात येत आहेत. जळगावात देखील शिवसेना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन शिवसेना शिवसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे. याच्या माध्यमातून शिवसेना जिल्ह्यात बळकट होणार यात शंका नाही.’ असे सांगून विष्णू भंगाळे म्हणाले, ‘आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता त्यादृष्टीने शिवसेनेने आतापासूनच संघटनेवर भर दिला आहे. राजकारणा सोबत समाजसेवेला महत्त्व आहे. याची जाणीव ठेवून शिवसैनिकांनी संघटन कौशल्य आणि जनसंपर्क मोहिमेवर अधिक भर दिला आहे.