(राजमुद्रा जळगाव) कोरोनामुळे सध्या कडक निर्बंध सुरू असून यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. त्यातल्यात्यात समाजाच्या मदतीवरच उपजिवीका करून जीवन जगणाऱ्या तृतीयपंथी समाजावर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. याबाबतची माहिती मिळताच ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांनी या समुदायाची व्यथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कानावर टाकली. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी काल (ता.10) तातडीने या समुदायातील सदस्यांसाठी जीवनावश्यक किटची व्यवस्था केली. शहरातील अजिंठा विश्रामगृहात तृतीयपंथी समुदायातील सदस्यांना या किटचे वाटप करण्यात आले.
“तृतीयपंथी समाज हा आधीच उपेक्षित असून सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आपत्ती आल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. ही मदत फार मोठी नसली तरी त्यांच्यासाठी काही दिवसांपर्यंत ती पुरणारी आहे. आपण याला मदत मानत नसून ते आपल्या घरातीलच सदस्य असल्याने हे घरच्या मंडळीला केलेले सहकार्य आहे.” असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
दरम्यान तृतीयपंथियांच्या मदतीने या समुदायासाठी काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की “पालकमंत्र्यांनी केलेली मदत ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी या माध्यमातून आमचे पालकत्व स्वीकारले असल्याचे भावपूर्ण उदगारही त्यांनी याप्रसंगी काढले.”
या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, नगरसेवक मनोज चौधरी, डीपीसी सदस्य श्याम कोगटा, सा.बा.चे सहाय्यक अभियंता सुभाष राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.