राजमुद्रा वृत्तसेवा | संसदचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा होऊन गेला असला तरी सभागृहात गोंधळ कायम असून आज सोमवारीही सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात गोंधळापासून झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज दुपारी २:४५ वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विशेष म्हणजेच आज दुसऱ्यांदा या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
संसेदच्या दोन्ही सभागृहात एकही दिवस व्यवस्थित काम झाले नाही. विरोधी पक्ष पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि भास्कर समुहावरील छापेमारीवरुन सरकार हल्लाबोल करत आहे. लोकसभा आणि राज्यसभेने जारी केलेल्या नोटिसांनुसार, केंद्र सरकारने या आठवड्यातील कामकाजासाठी पाच अध्यादेशांची यादी केली आहे. यामध्ये होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, भारतीय औषध केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश आणि आवश्यक संरक्षण सेवा अध्यादेश यांचा समावेश आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. “मी शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत जात असून सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपला जात आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.
कामाकाजाच्या सुरुवातील राजसभा सदस्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धाच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेने वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, मीराबाई चानू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले हे तुम्हाला सांगताना मला खूप आंनद होत आहे. सभागृहाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, इतर खेळाडू देखील आपापल्या खेळात चांगली कामगिरी करतील आणि देशाचा नाव मोठे करतील असे ओम बिर्ला म्हणाले.