मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला अशा अनेक जिल्ह्यात महापुराने थैमान घातलं असून महापूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी त्यामुळे चिखल आणि घाणीचं साम्राज्य प्रत्येक शहर, गावात पाहायला मिळत आहे. त्यामुळे या महापुरानंतर आता रोगराई वाढण्याची भीती व्यक्त अकेली आजत आहे. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
‘महाड आणि इतर ठिकाणच्या दुर्घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत. कुणीही कल्पना करु शकत नाही इतका फटका बसलाय. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे, यापुढेही ते सुरु राहील अशी अपेक्षा आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहे. ही परिस्थिती खूप भिषण आहे. यापूर्वीही असे अनेक पूर राज्यानं पाहिले आहे. जनतेनं संयम ठेवावा, मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून आहेत’, असंही देशमुख म्हणाले.
दरम्यान, महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती आहे. लेप्टो, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग पसरू नये यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. तिथल्या तिथे मेडीकल सुविधा पोहोचवण्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना केली गेली आहे. अतिरिक्त टीम पाठवण्यात येईल, असंही देशमुख म्हणाले. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ असल्याचं आवाहनही देशमुख यांनी यावेळी केलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन दिवसांपूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूरस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल. आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांसह पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांकडूनही तसं आश्वासन देण्यात आलं आहे. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २०१९ च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते. २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.