जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथे मतदार संघातील काही प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून गेल्या ८ ते १० वर्षापासून कार्यरत आहे. परंतु त्यांना आज पर्यंत कौटुंबिक हेल्थ विमा पॉलिसी लागू करण्यात आलेली नाही. या विमा पॉलिसीसह इतर प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे.
महानिर्मिती कंपनी कडून प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी हे सेवेवर कार्यरत असताना दुर्देवाने कोणता अपघात घडल्यास त्यांना जीव गमवावा लागतो किंवा शारीरीक मोठी ईजा होते. या करीता कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांना कौटुंबिक विमा हेल्थ पॉलिसी लागू करणे बाबत तत्काळ उपाययोजना करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
महानिर्मिती कंपनी मध्ये गेल्या कित्तेक वर्षापासून जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे त्यांना सेवा जेष्ठते नुसार तंत्रज्ञ 3 या पदावर सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्यात यावे, ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवार यांना ३ वर्षांच्या वरती झालेले आहेत त्यांना ट्रेड टेस्ट घेउन चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून रुजू करून सेवा जेष्ठते नुसार पदाच्या उपलब्धते नुसार टप्याटप्याने बढतीत प्राधान्य देण्यात यावी, प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण घेत असतांना महानिर्मिती कंपनीच्या जाचक अटीमुळे वय ४५ पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये चतुर्थ श्रेणी पदावर सामावून घेण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन यावेळी सदर करण्यात आले.
या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी यांना न्याय मिळावा अशीही मागणी कर्मचारी यांनी निवेदनात केली आहे. निवेदन देताना प्रकल्पग्रस्त न्याय हक्क समितीचे गणेश कोळी, लक्ष्मण कोळी, शशांक भटकर, मनोज वारके, गणेश तायडे, अनिल तायडे, गुंजन वाणी आदी उपस्थित होते.