जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | व्यवसाय पूर्णपणे सुरू नसल्याने आर्थिक अडचण जाणवत आहे. तसेच व्यापार मंदावला असून दुकाने पूर्णवेळ उघडण्याची मागणी होत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला असून दुकाने पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आज कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) तर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यापाऱ्यांनी साकडे घातले आहे.
गेल्या वीस दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात शहरात कोरोना व डेल्टा संक्रमण पूर्णपणे आटोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात व्यवसाय बंद असल्याने व्यापारी आर्थिक व मानसिक तणावात आहे. आर्थिक भार खूप वाढल्याने अनेक जण आत्महत्या करीत आहेत. बंदमुळे दैनंदिन खर्च, पगार, दुकान व गोडाऊन भाडे, लाईट बिल, व्याज, विविध आजारावरील उपचार खर्च सुरू असल्याने भांडवलही संपले आहे. त्यामुळे व्यापार खूप मंदावला आहे. व्यापार करणे खूप अवघड होत आहे. तरी शासनाने पूर्णवेळ दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात कठीण परिस्थितीत सर्व व्यापार बंद ठेवून व्यापारी वर्गाने शासनास संपूर्ण सहकार्य केले आहे. आता आपणाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी कॅटचे राज्य शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा, संचालक रामजी सुर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी आदी उपस्थित होते.