जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | एरंडोल येथील दाखल असलेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपी पवन महाजन (वय २८) याचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संबंधितांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, एरंडोल येथील झालेल्या एका खून प्रकरणात पवन महाजन (वय २८) हा गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्हा कारागृहात होता. परंतु गेल्या सात आठ दिवसापासून तो आजारी असतानाही त्याच्याकडे कारागृह प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बुधवारी पहाटे त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कारागृह प्रशासन जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनास्थळी मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करून जिल्हा कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत.