(राजेंद्र शर्मा)
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर पदाची सूत्रे जयश्री सुनील महाजन यांनी घेतली. पालिकेवर भगवा फडकला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत शहरातील प्रमुख प्रश्न आणि समस्या लक्षात घेऊन त्या यशस्वीपणे सोडवण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले. पालिकेच्या कामकाजाची आणि कार्यपद्धतीची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानुसार तत्काळ काही समस्यांचा निर्णय घेऊन महापौरांनी त्या मार्गी लावल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
शहराचा विकास करतांना अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे लोकांची मोठी अडचण होत होती. या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी पालिकेच्या दैनंदिन कार्यपद्धतीची माहिती मिळवली. कोणत्या प्रश्नांना, कोणत्या विषयांना अधिक महत्व दिले पाहिजे याची जाणीव ठेवून त्यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले.
महापौर जयश्री सुनील महाजन यांनी आपल्या कामकाजाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी हुडको कर्ज प्रकरण, आकृतीबंध बिंदुनामावली, अनुकंपा भरती, खुला भूखंड या संदर्भातील राहिलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. या विषयांवरील संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा व बैठक घेतली. तसेच शहरातील रस्ते आणि गटारी तयार करण्याबाबत लक्ष केंद्रित करून त्यासाठी मंत्रालयातून विशेष निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला असून, त्याला लवकरच यश लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘राजमुद्रा दर्पण’ सोबत बोलतांना महापौर जयश्रीताई म्हणाल्या, महापालिकेतील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा केल्यानंतर त्यांना मोठे यश मिळाले. पालिकेतील कायम अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात देखील त्यांनी पाठपुरावा सुरू करुन बाजी मारली आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडून शहराच्या विकासासाठी ६१ कोटी रुपयाचा निधी मिळवून दिला आहे. त्यासाठी महापौर यांच्यासह त्यांच्या टीमने शर्थीने प्रयत्न केले होते. त्याला यश देखील लाभले आहे.
पालिकेला ६१ कोटीचा निधी प्राप्त झाला. त्यानुसार त्यामधून शहरातील मुख्य रस्त्यांची कामे मंजूर केली असून, पावसाळ्यानंतर तात्काळ ही कामे मार्गी लागणार आहेतक. याबाबत सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ सुरु करण्यात आला. यामध्ये दूरध्वनीद्वारे नागरिक आपल्या समस्या मांडू शकतात. त्या त्वरित निराकरण करण्यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या महापौर कक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. याचे खरे श्रेय लोकांनी त्यांना दिले आहे.
तसेच गोलाणी मार्केट व महात्मा गांधी मार्केट परिसरातील भुयारी गटारींचा पंधरा वर्षापासून प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावला. मार्केट मधील सर्व गटारींची साफसफाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले आहे. महिला वर्गांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन केंद्राची उभारणी लाठी शाळेत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते कार्यान्वित केले जाणार आहे.
दिव्यांगांसाठी असलेल्या शिक्षण रोजगार पेन्शन या संदर्भातील योजना येणाऱ्या महासभेत मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा आता ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासाठी बँकेत संपूर्ण प्रक्रिया राबवून भ्रमणध्वनीद्वारे सर्वसामान्य नागरिक घरी बसल्याजागी मालमत्ता कराचा भरणा करू शकतात, असेही त्या म्हणाल्या. पिंप्राळा व का. उ. कोल्हे विद्यालयात त्या भागातील नागरिकांची लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये म्हणून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.
तसेच शहरातील लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील केरकचरा, नाल्यांची सफाई युद्धपातळीवर करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत त्यांनी सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्याचे निराकरण केले. त्यांना मिळणाऱ्या सुख सुविधा यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. शहरातील सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापौरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रयत्न सुरू केले आहेत. वेळप्रसंगी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून त्यावर भर देण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी विविध उपाययोजना व प्रयत्न त्यांनी सुरु केले आहेत.
घंटा चेहरा बदलणार पाऊस आला कि जैनाबाद ते लेंडी नाला कांचन नगर मधून आणि चौघुले प्लॉट या रोडाने पायी चालून बघा
मग बाकीची विकासाची कामे करा