जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे दिग्गज नेते माजी मंत्री एकनाथ खडसे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर त्यांच्या एखाद्या निकटवर्तीयांना पहिल्यांदाच महत्वाचे पद मिळत असून पालिकेचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी हे जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तर माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या फेरबदलाची घोषणा लवकरच राष्ट्रवादीतर्फे केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून अनेक महिन्यांचा कालावधी झाला आहे. या काळात त्यांच्या समर्थकांची कुठेच वर्णी लागली नव्हती. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी आता अशोक लाडवंजारी यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून हा फेरबदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान जळगाव महानगरात आगामी काळात बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशोक लाडवंजारी यांचे अस्थित्व पणाला लागणार आहे. लवकरच राष्ट्रवादीमध्ये मोठमोठ्या पदांमध्ये होत असलेल्या बदलामुळे पक्षाने पुन्हा जिल्ह्यात संघटन कौशल्य वाढीवर भर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई येथे गुरुवारी या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणाऱ्या फेरबदल याबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.