जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हयातील प्रमुख नगदी पिक असलेल्या केळी या पिकास वेळोवेळी होणाऱ्या वादळी वारे, गारपीट, कमाल-किमान तापमान यांमुळे मोठे नुकसान होत आहे. याकरीता हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत केळी या पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. केळी या पिकात वादळी वाऱ्याने केळीची पाने फाटल्यास व केळीचे कंद, रोपे अथवा झाडांची मुळे मोकळी झाल्यास मोठ्याप्रमाणावर शेतक-यांचे नुकसान होत आहे. परंतु सदरील बाबींचा केळी पिक विमा योजनेत कुठेही समावेश करण्यात आला नसून, हा केळी पीक उत्पादकांवर अन्याय आहे. परिणामी या नुकसानीचा समावेश केळी पीक विमा निकषात करावा अशी मागणी खा. उन्मेश पाटील यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
खा. उन्मेश पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, या बाबत मी केळी संशोधन केंद्र, निमखेडी ता.जि.जळगाव यांच्या कडून माहिती घेतली असता, केळीचे घड निसवण्याच्या व फळ वाढीच्या काळात केळीची पाने जास्तीची फाटल्यास पाने लवकर कोरडी होतात. ज्यामुळे घड पोसण्यास आवश्यक तेवढी पाने राहत नाहीत. या मुळे उत्पादनात व गुणवत्तेत घट होऊन शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. तसेच वादळी वाऱ्याने केळी कंद/रोपे/झाडांची मुळे सैल झाल्यास झाडांना मिळणारे अन्नद्रव्य पुरेसे मिळत नाही. यामुळे घडावर विपरित परिणाम होऊ शकतो.
तसेच केळ, खोड एका बाजूला झुकतात व थोडया हवेमुळे झाड कोलमडून पडते. यामुळे मालाची दुय्यम प्रत मिळत असल्याने बाजार भावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांना अपला माल विक्री करावा लागतो. तरी सदर बाब लक्षात घेऊन याबाबत विमा संरक्षण मिळवून देण्याची मागणी खा. उन्मेश पाटील यांनी राज्याच्या कृषी मंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केली आहे.