जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात आज महापालिकेत सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ‘घरचाच आहेर’ दिला असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची ‘फोटोफ्रेम’ आयुक्तांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तो आयुक्तांनी न स्वीकारल्याने हा प्रयत्न फोल ठरला आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा सल्ला घेण्यासाठी जळगावचे महापौर व विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे धाव घेत असतात. पालिकेच्या वर्तुळात याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले हे ‘अनोखे’ आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशोक लाडवंजारी हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. हे सर्वश्रुत असताना त्यांनी आज जळगाव महापालिकेत ‘शहरातील रस्त्यांच्या भयावह अवस्था आणि खड्ड्यांची झालेली दुरावस्था’ याचे चित्र मांडले.
एकीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या समस्यांसाठी आगळेवेगळे आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आंदोलनाची शहरात चर्चा होताना दिसून येत आहे. पालिकेच्या राजकारणात सुनील महाजन यांचे गॉडफादर म्हणून एकनाथ खडसे सध्या ओळखले जातात. वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुनील महाजन हे निर्णय घेत असतात. तसेच अशोक लाडवंजारी हे देखील खडसे यांचे समर्थक असल्यामुळे त्यांना शहरातील समस्यांबाबत आंदोलन करावे लागते. मात्र आजच्या या ‘अनोख्या आहेराच्या’ प्रकारावरून ‘नेमके त्यांना काय सांगायचे आहे?’ यावर राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.