(राजमुद्रा अमळनेर) (ता 9) मातृदिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व तमाशा परिषद जळगाव यांच्या प्रयत्नातून लोकवर्गणीचा सहभाग घेत जिल्हाभरातील तमाशा कलावंत, नाट्य कलावंत, सिनेमा कलावंत, गोंधळी वासुदेव, चित्रकार व विविध क्षेत्रात सादरीकरण करून आपला उदरनिर्वाह चालवीत असलेल्या कलाकारांना मदतीचा हात देऊ केला.
कला क्षेत्रातील कलाकार मात्र वंचित होत असताना जळगाव जिल्हा शाखा नाट्य परिषदेने व तमाशा परिषदेने विविध संघटना समाजातील दानशूर व्यक्ती यांना आवाहन केले. त्यातून कलावंतांच्या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा शिधा किराणा मालाच्या किट स्वरूपात जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात जाऊन वाटप करण्याचे ठरले आहे. त्या अंतर्गतच आज अमळनेरातील साने गुरुजी विद्यालयात एसेम्- गोरे सभागृहात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तमाशा कलावंत शेषराव पाटील, शाहिरी परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य संदीप घोरपडे, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सुलोचना वाघ, प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत, हेमकांत पाटील, प्रशांत निकम उपस्थित होते.
यावेळी संदीप घोरपडे यांनी कलाक्षेत्रातील कलावंतांचे आयुष्य उपस्थितांसमोर मांडले व व्यथा वेदनांना वाचा फोडली. त्यानंतर आपल्या मनोगतात आमदार अनिलदादा पाटील यांनी तमाशा कलावंतांना अमळनेर येथे हक्काचे विश्रांतीस्थान उभे करण्यासाठी व तमाशा कलावंतांना एक कार्यालयाच्या निर्मितीसाठी पंधरा लाखाचा निधी जाहीर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विनोद ढगे यांनी मानले. या कार्यक्रमातून आयोजकांनी समाजालाही आवाहन केले आहे की आपल्या आजूबाजूला जे कलावंत संकटग्रस्त असतील त्यांना मदतीचा हात द्यावा व भविष्यातील आपल्या भावी पिढीला निर्मळ जीवन जगण्यासाठी कलाकारांचे मनोबल वाढवावे कलाकारांनी देखील नाट्य परिषदेने देऊ केलेली मदत सन्मानाने स्वीकारली व शासनाने देऊ केलेली पाच हजार रुपयाची मदत लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.