(राजमुद्रा नंदुरबार) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच रमजानचा महिना सुरू असल्यानं नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव मशिदीत जात असल्याने गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. हे लक्षात घेऊन मशिदीत गर्दी करू नका, असं सांगत नमाज पठण करण्यापासून रोखल्याने नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर दोन मुस्लीम गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील 6 जण जखमी झाले असून सध्या या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 8 मे रोजी रात्री शहरातील मुस्लीम बांधव चिराग अली मशिदीसमोर नमाज पठणासाठी जमले होते. यावेळी ‘कोरोना काळ असल्यामुळे मशिदीसमोर गर्दी करू नका, फक्त पाच जणांना आत प्रवेश करण्यास परवानगी असल्याने नियमांचे पालन करा’ असे आवाहन करण्यात आले. मात्र या सूचनेचा राग येऊन नमाज पठण करण्यापासून रोखल्यामुळे एक जमाव दुसऱ्या जमावावर धावून गेला. त्यानंतर थोड्याच वेळात दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली आणि याचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकनं हल्ला करत दोन्ही गटांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत.
तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलं कसं काय? असा जाब विचारत एका गटाने लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकने दुसऱ्या गटावर हल्ला केला. तेंव्हा समोरच्या गटानेही प्रतिहल्ला चढवल्याने मोठा वाद निर्माण होऊन हाणामारीत रूपांतर झाले. नमाजपठणावरून झालेल्या या हाणामारीत एकूण सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. उर्वरित 9 जणांचा पोलीस शोध घेत आहेत.