मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपाचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. भाजपाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
“आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केलं जाणार असून या बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजकीय टोलेबाजीही केली. “सतेज पाटीलजी, डबल सीट म्हणाले. पण आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी कुणी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचा समाचार घेतला.