राजमुद्रा वृत्तसेवा | नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले असून, त्यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाल्याची माहिती नुकतीच सूत्रांकडून हाती आली असून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोर्चा रोखण्याचा भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाल्याने, वादावादी व नंतर धक्काबुक्की झाली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याचेही दिसून आले.
मिळालेल्या माहिती नुसार, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले असं सांगण्यात आलं आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला असून पोलिसांची जादा कुमकही मागवली आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून मागे फिरावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.