मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीसाठी मदत करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी जीवित व वित्तहानी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य त्या मदतीची अपेक्षा पूरग्रस्तांना लागून होती. याबाबत आज मुख्यमंत्र्यांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.