भडगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भडगांव तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे १७ ट्रॅक्टर/ट्रॉली वाहने जप्त करुन तहसिल कार्यालय, भडगांव येथे लावण्यात आले आहेत. या वाहन मालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केलेबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबधित वाहनमालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९९६ चे कलम १७६ ते १८४ मधील तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून वरील तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालय, भडगांव व शासकीय विश्रामगृह, भडगांव येथे १३ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. असे सागर ढवळे, तहसिदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, भडगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्यात येणार आहे. अटाकावुन ठेवलेल्या वाहनाचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, जळगांव यांचेकडुन मुल्यांकन प्राप्त झाले असून या मुल्यांकनानुसार उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांचेकडुन लिलाव करणेस मंजुरीही प्राप्त झाली आहे. तरी या वाहन मालकांनी विक्रीकरीता निश्चित केलेल्या तारखेपुर्वी देय रक्कम शासन जमा करावी अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येईल.
लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरिता तहसिलदार, भडगांव यांचे कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही ढवळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.