(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोना महामारीच्या काळामध्ये बरेच कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र हे कर्तव्य बजावत असताना काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला आहे अशा कर्मचाऱ्यांना कोविड विम्याचे संरक्षण दिले जाऊन भरपाई मिळावी अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. यासाठी तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी योजना राबवताना कोरोनाला रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत .जनसामान्यांना दिलासा देत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहे. या सर्व कामांमध्ये प्रशासना बरोबर अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विनाअनुदानित कर्मचारी तसेच कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी यांनी सुद्धा अत्यंत सेवाभावी पणे काम केले आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असताना अनेकांवर मृत्यू ओढवला असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या निराधार कुटुंबीयांचा माणुसकीच्या भूमिकेतून महाराष्ट्र सरकारने विव्हर करत सदर कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी फॅमिली पेन्शन तात्काळ सुरू करावी. तसेच जे कर्मचारी पेन्शन नियमात बसत नाहीत अशांना डीसीपीएस व एनपीएस कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावे. सदर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियमानुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी विशेष बाब म्हणून तातडीने सामावून घ्यावे अशा विविध मागण्या आमदार सुधीर तांबे यांनी आपल्या पत्रात नमूद केल्या आहेत.
याचबरोबर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे तसेच कोणतेही लक्षण असेल तर तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, कर्तव्य बजावत असलेल्या बांधवांनीही कर्तव्य बजावताना डबल मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे किंवा कोणतीही लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही आमदार सुधीर तांबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.