मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना बसलेला पावसाचा जोरदार तडाखा, मुंबईची पहिल्याच पावसानं झालेली परिस्थती या प्रकारामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. मुंबईत दरवर्षीच्या पावसामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आणि निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य स्थितीमुळे विरोधकांनी सरकारवर अनेकदा परखड शब्दांमध्ये टीका केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईप्रमाणेच जगभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीयेत, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.
मुंबईतील एच पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाविषयी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
“मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडतोय. पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय. तिथे तर महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. बीजिंग किंवा जिथे कुठे जगभरात पूर आले, त्या महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील ते बोलत असतील”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“ज्या प्रमाणे ही पुराची आपत्ती आली, त्यावेळी स्थानिक प्रशासनाने ४ लाखांहून जास्त नागरिकांचं स्थलांतर केलं, म्हणून सुदैवाने मोठी प्राणहानी टळली. दुर्दैवाने काही प्रमाणात तिथे प्राणहानी झाली. चिपळूण, महाड, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी पूर आला. तिथे देखील मुंबई पालिकेने आपल्या टीम पाठवून तिथल्या नागरिकांना देखील मदत केली”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.