जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | विधानसभा उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांची नुकतीच जळगाव येथे आढावा बैठक पार पडली. दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील कोरोना विषयक कामकाजाचा आढावा घेऊन कोरोनाच्या कामासाठी सकारात्मक कार्यपद्धतीचा अनुभव घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सोबतच जिल्ह्यातील शासकीय विविध योजनांच्या संदर्भात आढावा घेतला.
निलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बंद दरवाजातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने कोरोनाच्या काळातील सकारात्मक कामांचा तसेच जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत नंतर अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन चर्चा केली. यात एकाल शेतकरी विधवा महिला पुनर्वसन, लसीकरणाची कासवगती तसेच युती संदर्भातील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
नीलमताई गोऱ्हे यांच्या जळगावात ‘आज झालेल्या आढावा बैठकीतून नेमके काय निष्पन्न झाले?’ याबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नीलमताई गोऱ्हे यांच्या आजच्या दौऱ्यातून विशेष असे परिणाम हाती आले नसल्याने राजकीय वर्तुळात एक प्रकारे निराशा व्यक्त केली जात आहे. कोणत्याही महत्त्वाच्या मुद्याला घेऊन कुठल्याही प्रकारची समाजोपयोगी कामे होणार असल्याची ग्वाही अथवा आश्वासन मिळाले नसल्याने विधानसभा उपसभापतींचा जळगाव दौरा विशेष महत्त्वाचा ठरला नसल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.
मुळात महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकत असताना विकास कामांना आलेली संथ गती, त्यातल्या त्यात नीलमताई गोऱ्हे यांचे कुठल्याही प्रकारचे न मिळालेले ठळक आश्वासन आणि त्यांनी राजकीय प्रश्नांवर उत्तरे देण्याची टाळलेली मनीषा यावरून विशेष असे काहीही हाती न लागल्याने जळगावकर नाराज असल्याचे दिसून आले आहे. राज्य पातळीवरच्या महत्वाच्या पदाधिकारी असतांनाही जळगावातील त्यांचा दौरा फक्त आढावा बैठकीपुरताच मर्यादित राहिला असल्याने नाराजी व्यक्त केई जात आहे.