मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुंबई महानगर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं सतर्कतेचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयाती ज्या इमारतीजवळ ही गळती सुरू झाली, त्या इमारतीतील रुग्णांना परिसरातल्याच दुसऱ्या इमारतीत हलवलं. गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच मुंबई महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक आणि अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने गॅसची गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दुपारी १२ च्या सुमारास एलपीजी गॅस गळती सुरू झाल्याचं समजल्यानंतर तातडीने गळती रोखण्याचं काम सुरू करण्यात आलं. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरे पेडणेकर यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या इमारतीत हलवण्याबरोबरच सुरक्षेचा उपाय म्हणून समोरच्या इमारतीतील नागरिकांना देखील सतर्कतेचा उपाय म्हणून इमारतीच्या बाहेर थांबण्यास सांगण्यात आलं आहे.